किसान मोर्चासोबत कोण चर्चा करणार !! जाणून घ्या !!

184

मुंबई : मजल-दरमजल करत नाशिकमधून निघालेला शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. ठाण्यातील मुक्कामानंतर हा मोर्चा उद्या, म्हणजे 12 तारखेला विधीमंडळावर धडकणार आहे. किसान सभेतर्फे हा मोर्चा काढण्यात आला.

सरकारकडून सकारात्मक हालचाली
किसान मोर्चासोबत चर्चेसाठी आता सरकारनं सकारात्मक हालचाली सुरु केल्या आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन विक्रोळीमध्ये मोर्चेकऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे गिरीश महाजन सरकारच्या वतीनं मोर्चेकऱ्यांना काय आश्वासनं देतात, हे पाहणं महत्वाचं आहे.

राज ठाकरे भेट घेणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे संध्याकाळी पाच वाजता सोमय्या मैदानावर किसान मोर्चातील शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. स्वत: राज ठाकरे यांनी किसान सभेचे सचिव अजित नवले यांना फोन करुन, पाठिंबा जाहीर केला होता. मुंबईत आल्यानंतर या लाँग मार्चमध्ये मनसैनिकही सहभागी होतील, असं राज ठाकरे यांनी सांगितल्याचं अजित नवले म्हणाले होते.

सर्वपक्षीय पाठिंबा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही ट्वीट करुन किसान लाँग मार्चला पाठिंबा जाहीर केला. ‘शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी निघालेल्या नाशिक मुंबई किसान लाँग मार्चला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या सरकारविरोधातील या संघर्षात काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी हट्टीपणा सोडून शेतकऱ्यांशी चर्चा करावी व त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात.’ असं ते म्हणाले.

ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी अजित नवलेंची भेट घेऊन त्यांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं सांगितलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आपल्याला पाठिंबा जाहीर केला आहे, तसा निरोप घेऊन मी आल्याचं शिंदे म्हणाले, असं नवलेंनी सांगितलं होतं.

शिवसेनेपाठोपाठ राज ठाकरे यांच्या मनसेनेही किसान सभेच्या लाँग मार्चला पाठिंबा दिला होता. शेकाप नेते जयंत पाटीलही शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी झाले होते.

– abpmajha.abplive.in